वाळूतस्करांवर कारवाई करा ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळूतस्करांवर कारवाई करुन, कुटूंबीयांना संरक्षण मिळण्यासाठी पठाण कुटूंबीयांच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. यामध्ये फरजाना पठाण, सादिक पठाण, सरवर सय्यद आदिंसह पठाण कुटूंबीय सहभागी झाले होते.

राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे वाळूतस्कर रमजान इनामदार यांच्यासह अमीना इनामदार, अल्ताफ इनामदार, आलीम इनामदार, शिरीन इनामदार, सॉलिया इनामदार आदिंनी पठाण यांच्या घराचे गेट तोडून घरातील सदस्यांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण केली. तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील वयोवृध्दांना देखील मारहाण करण्यात आल्याने त्यांची प्रकृती खालवली आहे.

मागील भांडणाचा राग धरुन ही मारहाण करण्यात आली आहे. लोणी पोलीस स्टेशनला मारहाणीची फिर्याद देण्यासाठी गेले असता, आमची फिर्याद न घेता मारहाण करणार्‍या वाळूतस्करांच्या कुटूंबीयांना बोलावून क्रॉस कम्प्लेट करण्यास लावली. तर सदर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे पठाण कुटूंबीयांनी निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकरणात जेलमध्ये गेलेला रमजान इनामदार जामीनवर सुटला असून, दररोज शिवीगाळ करुन जीवेमारण्याची धमकी देत आहे. पोलीस सदर वाळूतस्कर व गुंडप्रवृत्तीच्या आरोपीवर कारवाई करीत नसून, त्याच्यापासून सर्व कुटूंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करुन, सदर आरोपीवर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी पठाण कुटूंबीयांनी केली आहे.