पैसे घेऊन माझ्या तडीपारीचा प्रस्ताव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकांचा धसका घेऊन पोलिसांनी पैसे घेऊन सूडबुद्धीने माझ्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. त्याच्या निषेधार्थ मी लवकरच विधानभवनासमोर उपोषणास बसणार आहे, असा सणसणीत आरोप शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केला आहे.

राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव सर्वप्रथम ‘पोलीसनामा’ने प्रसारित करताच राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तडीपारीच्या प्रस्तावाबाबत राठोड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. राठोड म्हणाले की, केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजून मोकाट आहेत. त्यांच्या न्यायासाठी मी लढत असताना पोलिसांनी सूडबुद्धीने राजकीय दबावाखाली माझ्या विरोधात पैसे घेऊन तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. याच्या निषेधार्थ मयत वसंत ठुबे व संजय कोतकर यांच्या नातेवाईकांसमवेत लवकरच विधानभवनासमोर आमरण उपोषण करणार आहे.

माझी सामाजिक क्षेत्रात बदनामी होईल, हे डोळ्यासमोर ठेवून हे षडयंत्र रचण्यात आलेले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य केले आहे. त्यामुळे संबंधिताची चौकशी करून त्यांच्यावर  कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी लवकरच मुंबईत उपोषण सुरू केले जाणार आहे, असेही राठोड म्हणाले.