500 रूपयांसाठी केली प्रेयसीची हत्या, पती बेपत्ता झाल्यानंतर महिलेसोबत राहात होता प्रियकर

फतेहपुर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या फतेहपुरमध्ये अवघ्या पाचशे रूपयासाठी युवकाने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. आरोपी युवक या महिलेचा पती बेपत्ता झाल्यापासून तिच्या सोबत राहात होता. घटनेच्या वेळी दोघे एकाच खोलीत होते. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कोतवाली क्षेत्रातील शाहपुर गावचा रहिवाशी अंबिकाची पत्नी ननकी (35) गावात एकटीच राहात होती. तिची दोन मुले माहेरात राहतात. सुमारे पाच वर्षापूर्वी ननकीचा पती अंबिका हा बेपत्ता झाला होता. तेव्हापासून गावातील छत्रपाल तिच्या सोबत राहू लागला होता.

ननकीने सोमवारी सकाळी छत्रपालला नऊशे रूपये देऊन आपल्या बहिणीची मुलगी शारदा आणि तिच्या नवर्‍याला म्हणजेच जावयाला आणण्यासाठी पाठवले होते. सायंकाळी मुलगी आणि जावई छत्रपालसोबत घरी आले. मुलगी आणि जावई त्यांच्या मुलासह रात्री माळ्यावर झोपले. तर ननकी आणि छत्रपाल एका खोली गेले होते.

पोलिसांना शारदाने सांगितले की, मावशी (ननकी) छत्रपालकडे पाचशे रूपये मागत होती. दोघांमध्ये यावरून भांडण सुद्धा झाले होते. पहाटे चार वाजता छत्रपाल बाहेर पडला. त्याने ननकीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यानंतर तो घटनास्थळावरून पळाला.

शारदाने पोलिसांना कळवल्यानंतर सीओ योगेंद्र मलिक, कोतवाल नंदलाल सिंह घटनास्थळी पोहचले. शारदाच्या तक्रारीनंतर छत्रपालविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीओ योगेंद्र मलिक यांनी सांगितले की, महिलेचा गळा आवळल्याचे दिसत होते आणि ती जमीनीवर पडली होती.