दुर्देवी ! यात्रेला निघालेल्या वडील आणि मुलीचा मृत्यू

पुणे/राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील थापलिंग यात्रेला निघालेल्या वडील आणि तीन वर्षाच्या मुलीची दुर्दैवाने जीवनयात्राच संपल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली आहे. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीच्या पुलावर ही घटना घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या हाइवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने यामध्ये वडील आणि मुलीचा मृत्यू झाला.

सतिश बाळकृष्ण वळसे-पाटील आणि त्याची तीन वर्षाची मुलगी आरोही सतिश वळसे पाटील या दोघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून नाशिकच्या दिशेने जाणारा हायवा ट्रक (एमएच 15 जीबी 7275) जात होता. मंचर येथे सतिश वळसे पाटील यांच्या दुचाकीला (एमएच 14 डीएल 1557) हायवा ट्रकची धडक बसली यामध्ये सतिश आणि त्यांची मुलगी आरोही हे ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात सतिश यांच्या पत्नी जयश्री वळसे-पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. हे कुटुंब निरगुडसर या गावातील थापलिंग यात्रेनिमित्त निघाले होते. सतिश आणि आरोही यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना उपचारापूर्विच मृत घोषीत करण्यात आले. याच ठिकाणी दोघांचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मयत सतिश वळसे-पाटील हे एका कंपनीत कामाला होते. ते पुण्यातच कुटुंबासह राहात होते. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे. ट्रक चालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय-40 रा. वावी. ता. सिन्नर, नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/