पित्यानंतर अवघ्या 24 तासातच पुत्राचाही ‘कोरोना’मुळं मृत्यू, डॉक्टरवर आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनालाईन – ज्येष्ठ लोहियावादी व गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते हरीष अड्याळकर यांचं गुरुवारी सायंकाळी कोरोनामुळं निधन झालं असताना शनिवारी सकाळी त्यांचा मुलगाही याच आजरानं दगावल्यानं आता अड्याळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हरीष अड्याळकर यांना आठवड्याभरापूर्वी बरं वाटत नसल्यानं आणि त्यांचा मुलगा सर्वसाधारण उपचारासाठी डॉक्टरांकडे जात असल्यानं दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. हरीष अड्याळकर यांना रविवारी 30 ऑगस्ट रोजी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलं. मुलगा मात्र घरीच क्वारंटाईन झाला होता. गुरुवारी सायंकाळी हरीष यांचं निधन झालं. याचाच मोठा धक्का मुलगा नितीन अड्याळकर यांना बसला.

हरीष याच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी नितीन यांनाही अस्वस्थ वाटू लागलं. झोप न झाल्यानं असं वाटत असेल असा विचार करून औषध घेऊन ते घरीच राहिले. शनिवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांची अवस्था पाहिल्यानंतर घरच्यांनी लगेच 108 क्रमांकावर कॉल केला आणि रुग्णावाहिका व वैद्यकीय मदतीची मागणी केली. अर्ध्या तासात रुग्णवाहिका आली खरी परंतु त्यात ऑक्सिजन आणि स्ट्रेचर दोन्हीही नव्हतं. याशिवाय त्यात फक्त एक चालक आणि महिला डॉक्टर होती. त्यात अड्याळकर कुटुंब वरच्या मजल्यावर राहतं.

जेव्हा त्यांन सांगितलं की, पेशंट कोरोनाचं आहे तेव्हा त्यांनीही कपाळावर आठ्या आणल्याचं सांगितलं जात आहे. विनंती केल्यानंतर डॉक्टरांनी नितीन अड्याळकर यांची नाडी तपासली आणि ते मृत झाल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु रुग्णवाहिकेनं जर त्यांना मेडिकलला नेलं आणि उपचार केले तर वाचू शकतील असं कुटुंबाचं म्हणणं होतं. डॉक्टर मात्र मनपाच्या झोनची हद्द कुटुंबाला समजावत होत्या. शेवटी डॉक्टरसह ती रुग्णवाहिका निघून गेली. यानंतर पुन्हा एकदा दुसरी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू झाली. आयुष्यभर समाजासाठी धावणाऱ्या हरीष पड्याळकर यांच्या मुलासाठी एकही रुग्णवाहिका मिळत नव्हती.

जेव्हा मेडिकलचे अधीक्षक डॉ अविनाश गावडे यांना याबाबत कळालं तेव्हा त्यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास डॉक्टरांच्या पथकासह एक रुग्णावाहिका पाठवली. पंरतु तोवर खूप उशीर झाला होता. नितीन यांना मेडिकलला नेण्यात आलं आणि तिथं त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आलं. पहिली रुग्णवाहिका आली तेव्हा नितीन जिवंत होते मात्र दुसरी रुग्णवाहिका येईपर्यंत म्हणजेच 3 ते 4 तासांच्या काळात त्यांनी जगाचा निरोप घेतला. आधी आलेल्या महिला डॉक्टरनं जर संवदेनशीलता दाखवली असती तर त्यांचे प्राण वाचले असते असं घरच्यांना वाटत आहे. 53 वर्षीय नितीन एका खासगी प्रतिष्ठानात काम करीत होते. त्यांच्या पश्चात आता पत्नी, 1 मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे. ज्या मोक्षधाममध्ये शुक्रवारी पित्यावर अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी 24 तासात मुलावर अंत्यसंस्काराची वेळ या कुटुंबावर आली.