Pune : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पोटच्या मुलीवर कटरने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दारू पिण्यास पैसे न दिल्याने पोटच्या मुलीवर कटरने वार केल्याची धक्कादायक घटना खडक परिसरात घडली. लॉकडाऊनमध्ये नोकरी आणि काम मिळत नसल्याने तो बेरोजगार झाला होता. पण त्याला दारूचे व्यसन आहे.

याप्रकरणी कासेवाडी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन दिवसांपूर्वी लहान मुलीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने पैसे न दिल्याने तो कटर घेऊन तिला मारण्यास धाऊन गेला. यावेळी फिर्यादी तरुणीने हस्तक्षेप केला. त्याने लहान मुलीला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीवर कटरने वार करत तिचे डोके भिंतीवर आपटले. तरुणी, तिची लहान बहीण आणि भाऊ असे तिघेही छोटी-मोठी कामे करतात. तर आरोपीही रोजंदारीवर काम करतो. परंतु, लॉकडाऊनच्या काळात त्याला काम मिळत नव्हते. सध्याही तो बेरोजगार आहे. मात्र दारूचे व्यसन असल्याने तो मुलांकडे सतत पैशांची मागणी करत असतो. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.