धक्कादायक ! पोटच्या मुलींना ट्रकखाली चिरडून बापाची आत्महत्या, पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संशय घेत बापाने पोटच्या दोन्ही मुलींची ट्रकखाली चिरडून हत्या करत स्वत:आत्महत्या केली आहे. मावळ तालुक्यातील इंदोरी येथे शनिवारी (दि. 17) मध्यरात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नंदीनी भराटे (वय 18), वैष्णवी भराटे (वय 14) व भरत भराटे (वय 45, सर्व रा. अल्फानगर सोसायटी, इंदोरी) अशी मृत मुलींचे आणि वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई सपना भरत भराटे (रा. इंदोरी मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे कोठे तरी बाहेर प्रेमप्रकरण चालू असल्याचा संशय भरत भराटे याला होता. मुलीच्या अशा वागण्याने नाव खराब होईल, यापेक्षा जीव दिलेला बरा असे त्याने पत्नी सपना यांना सांगितले होते. असे बोलून भरत भराटे यांनी दोन्ही मुलींना रात्री रस्त्यावर झोपण्यास सांगितले आणि स्वतःच्या मालकीचा ट्रक (एम एच 12 एच डी 1604) चालू करून दोन्ही मुलींच्या अंगावर घालून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतः देखील चालू ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.