संतापजनक ! बाळंतपणाचं बील देण्यासाठी नव्हते 35 हजार रूपये, डॉक्टरांनी नवजात अर्भकास आईपासून वेगळं केलं अन् विकलं

आग्रा : वृत्तसंस्था –  डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते, पण तोच देव जर एका आईपासून तिचं बाळ हिरावून त्याला विकू शकतो हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं. पण अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात घडली आहे. प्रसूतीनंतर एका दांपत्याने 35 हजार रुपये देण्यास असमर्थता दाखवली. त्या महिलेने असा आरोप केला आहे की तिच्याकडून तिचं बाळ हिसकावून एका कागदावर जबरदस्तीने तिचा अंगठा घेण्यात आला.

बबिता (36) ने मागील आठवड्यात एका बाळाला जन्म दिला होता, ही डिलिवरी सर्जरीने झाली होती. या महिलेचं हे पाचवं अपत्य आहे आणि ती उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील शंभू नगरमध्ये भाड्याच्या घरात पती शिवचरण सोबत राहते. शिवचरण रिक्षाचालक आहे तो दिवसाचे 200 ते 300 रुपये कमावतो. त्यांचा मोठा मुलगा 18 वर्षांचा आहे तो एका बुटाच्या कंपनीत मजुरी करतो. कोरोना काळात तो काम करत असलेली फॅक्टरी बंद पडली आणि तो बेरोजगार झाला.

24 ऑगस्ट पर्यंत आशा वर्कर तिच्या घरी येत होती आणि फ्री मध्ये प्रसूती करून देणार असं तिनं सांगितलं. शिवचरणने तिला सांगितलं की त्यांचं नाव आयुष्यमान भारत योजनेत नाही, पण आशाने सांगितले की फ्री मध्ये इलाज करून देणार. जेव्हा बबिता हॉस्पिटल मध्ये पोहचली तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिला सांगण्यात आलं की सर्जरी करावी लागेल. 24 ऑगस्टला संध्याकाळी 6.45 वाजता तिने एका मुलाला जन्म दिला. हॉस्पिटलने त्यांचं बिल 35 हजार इतकं केलं होतं.

शिवचरणने सांगितले, ‘माझी पत्नी आणि मी निरक्षर आहोत, हॉस्पिटल मध्ये काही कागदपत्रांवर आमचा अंगठा घेण्यात आला. आम्हाला डिस्चार्ज पेपर दिले नाहीत, त्यांनी बाळाला एक लाख रुपयांना विकत घेतलं.’ या प्रकरणाची चौकशी आग्रा जिल्ह्याचे डिएम प्रभुनाथ सिंह करत आहेत. प्रभुनाथ सिंह म्हणाले, ‘प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.’

हॉस्पिटल प्रशासनाने केला खुलासा

हॉस्पिटलने दावा केला की या महिलेने बाळाला हॉस्पिटलमध्ये सोडलं होतं. त्याला आम्ही दत्तक घेतलं आहे विकत घेतलं किंवा विकलं नाही. आम्ही त्या बाळाला सोडण्यासाठी कोणतीही जबरदस्ती केली नव्हती. ट्रान्स यमुना भागातील जेपी हॉस्पिटलच्या प्रबंधक सीमा गुप्ता म्हणाल्या, ‘माझ्याजवळ आईवडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलेली कराराची एक प्रत आहे. यामध्ये त्यांनी स्वतः त्या बाळाला इथं सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.’

लिखित कराराची काही कामाचा नाही

तिकडे, बाल अधिकार कार्यकर्ता नरेश पारस यांनी सांगितलं की, हॉस्पिटलच्या स्पष्टीकरणाने त्यांचा गुन्हा लपणार नाही. बाळाला दत्तक घेण्याची प्रक्रिया केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणाने निर्धारित केली आहे. त्याच प्रक्रियेअंतर्गत बाळाला दत्तक घेता येतं. हॉस्पिटलकडे असणारा हा लिखित करार काही कामाचा नाही, त्यांनी गुन्हा केला आहे.’