मुलाच्या मृत्यूच्या धक्याने वडिलांचाही मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील मोगलाई परिसरातील महाले नगरात आज सकाळी अत्यंत मन हेलावणारी अशी घटना घडली. बापाच्या डोळ्यादेखत तरुण मुलगा ह्रदयविकाराने अकाली निघून गेला. तो धक्का असह्य झाल्याने वृध्द पित्यानेही मुलाच्या पाठोपाठ ह्या जगाचा निरोप घेतला. ह्या घटनेने संपूर्ण महाले नगरसह परिसरात शोककळा पसरली आहे. आज दुपारी 4 वाजता दोन्ही पिता – पुत्रांच्या पार्थिवावर कुमार नगर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रभागात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

धुळे शहरातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र केतु मराठे उर्फ जितू पहेलवान यांचे आज सकाळी नाशिकच्या रुग्णालयात  निधन झाले. सहा महिन्यापुर्वीच त्यांच्यावर नाशिक येथे सिक्स सिंगमा हाॅस्पीटल येथे बायपास सर्जरी करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना प्रथम धुळ्यात खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना नाशिकला हलविण्याचा सल्ला दिल्यावरुन नाशिकला नेण्यात आले होते . तेथे उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आज 4 वाजता त्यांच्या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .

जितेंद्र मराठे उर्फ जितु पहेलवान हे केबल ऑपरेटरचे काम करत होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात जितु पहेलवान यांचा चांगला परिचय होता. मित्रमंडळीतही ते लोकप्रिय झाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर अचानकच घाला घातला. तरुण मुलाचा असा अकाली मृत्यू झाल्याने बापानेही धीर सोडला आणि वृध्द केतूराम बाबुराव मराठे यांचेही आज दुपारी 11 वाजता निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महालेनगर परिसरात शोककळा पसरली आहे. आज दुपारी 4 वाजता महाले नगरातील मराठे यांच्या घरापासून बाप-बेट्यांची अंत्ययात्रा निघेल. कुमानगर स्मशानभुमीत दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.