जमीन बळकवण्यासाठी पित्यानेच रचला मुलाच्या अपहरणाचा बनाव

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन  – मुलाचे अपहरण झाले म्हणून पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद देणारा पिताच या प्रकरणाचा कर्ताकरविता असल्याचे उघड झाले आहे. मुलाच्या नावची जमीन बळकावणे तसेच पत्नीच्या खुनात त्याने साक्ष देऊ नये म्हणून पित्याने त्याला विहिरीत ढकलून देत त्याच्या अपहरणाची फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील या अपहरण प्रकरणाचा गुंता सोडविण्यात अखेर पूर्णा पोलिसांना यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पूर्णा पोलीस ठाण्यात मागील वर्षी अनिल काळे यांच्या माहितीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात अनिल काळे यांनी त्यांचा मुलगा प्रसाद याचे कुणीतरी अपहरण करून त्यास विहिरीत टाकल्याची माहिती दिली होती. त्याअनुषंगाने पूर्णा पोलीस या घटनेचा तपास करीत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच अनिल काळे याच्या खोटारडेपणाची माहिती समोर येत गेली. अनिल काळे याच्याविरुद्ध चार वर्षांपूर्वी पूर्णा पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीच्या खून प्रकरणात भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मुलगा प्रसाद याची साक्ष होऊ नये यासाठी अनिल काळे याने त्याच्या मुलगा प्रसाद यास संपविण्यासाठी त्याच्या अपहरणाचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. मुलास संपवून त्याच्या नावे असलेली जमीन हडपण्याचा त्याचा इरादा होता. यासाठी त्याने मागील वर्षी मुलास शाळेतून बोलावून घेत गावातील प्रकाश काळे यांच्या विहिरीकडे नेऊन त्यास विहिरीत ढकलून दिले होते. त्याला पोहता येत नव्हते, परंतु सुदैवाने विहिरीत बांधलेला एक दोर त्याच्या हाताला लागल्याने तो बचावला. या प्रकरणातच अनिल काळेने प्रसादवर दबाव टाकून त्याच्या अपहरणासंदर्भातील तक्रार पूर्णा पोलीस ठाण्यात नोंद केली होती.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पूर्णा पोलिसांनी आरोपी अनिल काळे यास ताब्यात घेऊन यासंदर्भात विचारणा केली असता त्याने मुलाच्या नावे असलेली जमीन त्याच्या पे्रयसीच्या नावे करून आरामात जीवन जगता यावे याकरिता हा प्रकार केल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपी अनिल काळे यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस उपअधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, चंद्रकांत पवार यांच्या पथकाने केली.