Pune : मुलानं केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू

वेल्हे : पोलीसनामा ऑनलाईन –   पोटच्या मुलाने काठीने आणि लाथा- बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या बापाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात ही 22 नोव्हेंबर रोजी ही मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

रमेश विठ्ठल जोरकर (वय 55) असे मृत्यू पावलेल्या वडिलाचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय 29) यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयताची पत्नी संगिता जोरकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रकाश हा त्याच्या मित्रासोबत त्याच्या राहत्या घरी आला होता. त्यावेळी जेवणाचे ताट घेऊन बाहेर असे त्याने आपली पत्नी शकुंतला हिला सांगितले. पण त्यावर वडिलांनी तो काय जहागिरदार आहे का, येईल आतमध्ये असे म्हणण्यावरून किरकोळ वाद झाला. यात प्रकाशने सख्या बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण बेदम मारहाण केली. आरोपीची सावत्र आई व पत्नी शकुंतला यांनी भांडणे सोडविण्यास आले असता त्यांनाही न जुमानता वडिलांना लाथा- बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत जखमी झाल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज रमेश जोरकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी प्रकाश जोरकरला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

You might also like