फादर फ्रान्सिस दिब्रिटोंची 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. आज (रविवार) औरंगाबादमध्ये झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. बैठकीपूर्वी नावाची चर्चा होऊ नये, म्हमून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली.

कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही दिब्रिटो यांची ओळख आहे. 75 वर्षीय दिब्रिटो यांनी मागील वर्षी पुण्यात झालेल्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपादासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा.रं. बोराडे यांच्या नावाची मागील सहा महिन्यापासून चर्चा होती. अखेर आज झालेल्या बैठकीत दिब्रिटो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन करणारे फादर दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या ‘सुबोध बायबल – नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा 2013 या वर्षाचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. दिब्रिटो हे कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरु म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले आहे.

Visit :- policenama.com