मुलीला मारहाण केल्याच्या रागातून जावई ठार

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन – आपल्या मुलीला जावयाने मारहाण केली म्हणून संतप्त झालेल्या सासऱ्याने आपल्या जावयाला जबर मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत सदर जावयाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पतीकडून मारहाण झालेल्या महिलेची प्रकृती देखील गंभीर असल्याचं समजत आहे. मिरज तालुक्यातील सावळी गावामध्ये घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. जानेश्वर बामणे असे मृत जावयाचे नाव आहे.

जत्रेचं आैचित्य साधून जानेश्वर सावळी या आपल्या सासरवाडीमध्ये आला होता. परंतु अचानक काहीतरी कारणावरून जानेश्वर आणि त्याची पत्नी गीतांजली बामणेचे सासरवाडीमध्येच जोरदार भांडण झाले. या भांडणात संतप्त जानेश्वरने रागाच्या भरात गीताजंलीला जबर मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. आपल्या मुलीला केलेली मारहाण पाहून गीतांजलीचे वडील आण्णासो शिंदे यांचीही तळपायाची आग मस्तकात गेली. आणि आण्णासो शिंदे यांनी जावई  जानेश्वर बामणेला खांबाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत जानेश्वरचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

यानंतर या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत जानेश्वरचा सासरा आण्णासो शिंदेला ताब्यात घेतले आहे. इतकेच नाही तर आण्णासो शिंदेच्या बरोबर जानेश्वरला खांबाला बांधून आणखी किती जणांनी मारहाण केली, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.