Sangli News : धक्कादायक ! लग्नास नकार दिल्याने बापाने मुलीची केली हत्या, हृदयविकाराचा बनाव करून गुपचूप उरकला अंत्यविधी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मुलगा दिसायला चांगला नाही म्हणून मुलीने लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर बापाने मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचून मुलीवर पहाटे गुपचूप अंत्यसंस्कारही उरकून टाकले. सांगलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान मुलीच्या मृत्यूमागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय गावातील पोलीस पाटलास आल्याने त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बापाने गुन्ह्याची कबुली दिली.

उत्तम चौगुले असे अटक केलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तम चौगुले यांना 3 मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची सर्वात मोठी मुलगी सध्या बारावीत शिकत होती. तिने नुकतेच वयाची अठरा वर्षे पूर्ण केली होती. त्यानंतर तिच्या बापाने लगेच तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे सैन्यात नोकरीला असलेल्या एका मुलाचे स्थळ आले होते. त्याला सैन्यात चांगला पगारही होता, पण मुलगा दिसायला चांगला नाही, म्हणून मुलीने लग्नाला नकार दिला. त्यामुळे मुलीचे वडिल तिच्यावर नाराज झाले होते. दरम्यान 13 मार्च रोजी घरात कोणी नसताना आरोपीने पुन्हा एकदा मुलीला लग्नासाठी घाट घातला. पण मुलीने याला नकार दिला. संतापलेल्या बापाने शेतातील गाजर काढण्याच्या बेडग्याने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा जीव कधी गेला हे त्या बापालाही कळाले नाही. सायंकाळी घरातील सर्व सदस्य घरी परतल्यानंतर आरोपी बापाने मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. तसेच  कोणालाही काही कळायच्या आत त्याने पहाटे मुलीचा अंत्यसंस्कार देखील उरकून टाकला. याप्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.