पिंपरी : आईला त्रास देणाऱ्या ‘पित्या’ची मुलाने केली ‘हत्या’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  – दारु पिऊन येऊन आईला मारहाण करणाऱ्या पित्याला मुलाने लाकडाने मारहाण करुन त्याची हत्या केली. ही घटना देहुरोडमधील विठ्ठलवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विराज संतोष येळवंडे याला अटक केली आहे. संतोष विठ्ठल येळवंडे (वय ४७) असे खुन झालेल्या वडिलांचे नाव आहे.

याप्रकरणी कविता संतोष येळवंडे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येळवंडे यांच्या घरात रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. संतोष येळवंडे हा दारु पिऊन येऊन आपली पत्नी कविता हिला नेहमी त्रास देत, मारहाणही करीत असे. रविवारी रात्री तो दारु पिऊन घरी आला व कविताला मारहाण करु लागला. तेव्हा विराज हा मध्ये पडला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली.

आपल्या आईला मारहाण करीत असल्याच्या रागाच्या भरात विराज याने आपल्या वडिलांना लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडाचा घाव वर्मी लागल्याने संतोष गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी विराज येळवंडे याला अटक केली आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You might also like