Solapur News : उजनी पात्रात बोट उलटून बुडून बाप-लेकाचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वांगी परिसरात उजनी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असून त्या ठिकाणी पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे. मात्र, बोटीतून फिरताना गरजेच्या सुविधा नसल्याने जलाशयातील प्रवास अनेकांच्या जीवावर बेतत आहे. अशीच एक दुर्देवी घटना उजनी जलाशय येथे घडली. उजनी जलाशयात बोटीतून फेरफटका मारताना सेल्फी काढण्याच्या नादात बोट कलंडल्याने बाप लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी व मुलगी यांना वाचविण्यात आले आहे. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारी करमाळा तालुक्यात घडली.

विकास गोपाळ शेंडगे, (वय ३९) व त्यांचा मुलगा अजिंक्य विकास शेंडगे (वय-१३) रा.गुरुनगर, अकलुज अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर त्यांची पत्नी स्वाती, मुलगी अंजली यांना वाचविण्यात मच्छिमारांना यश आले आहे.

दरम्यान, अकलूज येथील शेंडगे दाम्पत्य केम ता. करमाळा येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी आले होते. त्यानंतर ते वांगी नं.३ येथील त्यांचे मित्र सातव यांच्याकडे गेले. तेथे उजनी जलाशयातून बोटीद्वारे फिरत होते. त्यावेळी सेल्फी काढत असताना बोट कलंडली. त्यामुळे सर्वजण पाण्यात पडले. त्यातील विकास शेंडगे, त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी स्वाती, मुलगी अंजली यांच्यासह शेंडगे यांचे मित्र सातव पिता, पुत्र यांना मच्छिमार व स्थानिक गावकर्‍यांनी पाण्यातून बाहेर काढून वाचविले.