दुर्दैवी ! डॉक्टर बाप-लेकाचा कोरोनामुळे पाठोपाठ मृत्यू, कल्याणमधील घटना

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा थैमान सुरु आहे. असे असतानाच पेशाने डॉक्टर असलेल्या बाप- लेकाचा कोरोनामुळे अवघ्या तासाभराच्या फरकाने पाठोपाठ मृत्यू झाल्याची-हद्यद्रावक घटना कल्याणमध्ये घडली आहे. दोघेही गेल्या वर्षभरापासून कोरोनाग्रस्तांची काळजी घेत होते. दोन्ही बाप- लेक डॉक्टरांच्या मृत्यूमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र समोर आले आहे.

डॉ. नागेंद्र मिश्रा (58 ) आणि डॉ. सूरज मिश्रा (28 दोघेही रा. कल्याण पश्चिम ) असे मृत बाप-लेकाचे नाव आहे. डॉ. नागेंद्र यांचा आधी मृत्यू झाला तर तासाने मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी डॉ. नागेंद्र यांचा वाढदिवस होता, वाढदिवसा दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. तर सूरजच्या आईची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. नागेंद्र, डॉ. सूरज यांचे लसीकरण झाले होते का? ते अजून समजू शकले नाही. डॉ. नागेंद्र यांचा टिटवाळा खडवली येथे दवाखाना होता. तर मुलगा सूरजचा भिवंडीत दवाखाना होता. त्याचे नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न झाले होते.

मुंबई महापालिका क्षेत्रात बेड्सची अपुरी संख्या असल्याने स्थिती किती भयंकर आहे. कुटुंबातील तिन्ही सदस्य वेगवेगळया महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होते. डॉ. नागेंद्र मिश्रा हे ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल होते. शुक्रवारी वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा सूरजला गोरेगावमधील एका खासगी रुग्णालयात बेड मिळाला. डॉ. नागेंद्र यांच्या पत्नीवर वसई-विरारमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याण पश्चिमेला गांधारी येथे हे कुटुंब राहत होते. डॉ. नागेंद्र यांचा दुसरा मुलगाही डॉक्टर आहे.