दुर्दैवी ! लेकीला शेवटचं पाहू देखील शकला नाही बाप, चिमुकलीवर आई-वाडीलांविना अंत्यसंस्कार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. तसेच राज्याच्या, जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने अनेक जण आपल्या घरी पोहचू शकले नाही. काहीजणांनी तर चालत आपल्या गावाकडे वाट धरली. दरम्यान,बीडमधील एका अडीच वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण सैन्यात असलेल्या वडिलांना आपल्या लाडाच्या लेकीला शेवटचं पाहायचं राहून गेलं.

बीड जिल्ह्यातील केज मधील युसूफवडगाव येथे राहणाऱ्या निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निकम कुटुंबातील अडीच वर्षीय हिंदवी या चिमुकलीचा दोन दिवसांपूर्वी सोलरची टाकी अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

हिंदवीची आई गरोदर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होत. त्यामुळे हिंदवी आपल्या आजीसोबत घरी होती. हिंदवी घराच्या गच्चीवर चुलत भावाबरोबर सोलरच्या टाकीच्या शेजारी खेळत असताना अचानक टाकीच हिंदवीच्या अंगावर कोसळली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

हिंदवीची आई प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल आहे. त्यांनी एका मुलाला जन्म दिला. परंतु, लाडक्या लेकीच्या मृत्यूची माहिती अजून त्यांना देण्यात आली नाही. कारण एकीकडे मुलाच्या जन्माचा आनंद तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यूचे दुःख. त्यातच आईची प्रकृती अस्थिर असल्याने डॉक्टरांनी माहिती देवू नये, असा सल्ला दिला. तर दुसरीकडे हिंदवीचे वडील सैन्यात आहे. त्यांना मुलीच्या निधनाची आणि मुलाच्या जन्माची माहिती मिळताच त्यांना मोठा हादराच बसला. संदीप निकम हे आसाममध्ये सैन्यात कर्तव्य बजावत आहे. मुलीच्या निधनाची बातमी मिळताच ते बीडकडे रवाना झाले आहे.

आज दोन दिवस उलटले असले तरी या चिमुकलीच्या अंत्यसंस्कारास तिच्या आई वडिलांपैकी कोनही येऊ शकले नाही. लॉकडाऊन मुळे तिचे वडील प्रवासात आहे तर प्रसूतीमुळे आई दवाखान्यात आहे. शेवटी नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी हिंदवीचे अंत्यसंस्कार करून घेतले. मात्र, या घटनेने युसूफवडगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे.