‘भारतीय वैमानिकाला सोडा’ : पाकच्या माजी पंतप्रधानांच्या नातीचा इम्रान खानला सल्ला

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाला पाकिस्तानने सोडावं असा सल्ला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो हिनं पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला दिला आहे. बुधवारी तिने तिची ही भावना व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर, इम्रान खान यांना सल्ला देताना फातिमा भुट्टो हिनं एका इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख लिहला आहे. ‘मी आणि अनेक पाकिस्तानी युवक आमच्या देशाकडे आग्रह करतोय की शांती, मानवता आणि प्रतिष्ठेच्या प्रती आपली प्रतिबद्धता राखत संकेत म्हणून भारतीय वैमानिकाला सोडण्यात यावं’ असं तिनं या लेखात म्हटलंय. फातिमा ही बेनझीर भुट्टो यांची भाची आहे.

आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य युद्धात घालवलंय. मी पाकिस्तानी आणि भारतीय सैनिकांना मरताना पाहू शकत नाही. माझ्या पिढीचे अनेक पाकिस्तानी लोक केवळ बोलण्याच्या आपल्या अधिकारासाठी लढत आहेत. आम्ही शांतीसाठी आपला आवाज उचलण्यासाठी कधीही घाबरणार नाही, असंही फातिमा भुट्टो हिनं म्हटलंय.

दरम्यान पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाई दरम्यान पाकिस्तानने भारताच्या वैमानिकाला ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धामान असं या वैमानिकाचं नाव आहे. बुधवारी हवाई कारवाई दरम्यान  अभिनंदन हे मिग २१ विमानातून सुरक्षित बाहेर पडले होते. परंतु यानंतर ते नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवाय त्यांना मारहाणही केली. त्यांचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना ताब्यात घेतले.

भारतीय वैमानिक जरी पाकच्या ताब्यात असला तरीही त्याची लवकर जिनिव्हा करारानुसार सुटका होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रसंघाच्या नियमानुसार, युद्धकैद्याला योग्य सन्मानासह त्याच्या राष्ट्राकडे हस्तांतरण केलं जातं. या नियमानुसार, भारतीय वैमानिकाला पाकिस्तानने भारतात परत पाठवावं असं पाकिस्तानला बंधनकारक आहे. यासाठी सरकारच्या वेगाने हालचाली सुरू आहेत.

दरम्यान भारतीय वैमानिकाला लवकरात लवकर आणि सुखरूप भारताकडे सोपवण्याचा डेमार्श (राजनैतिक पाऊल) पाकिस्तानातील भारतीय उच्चायोगानंही पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाला दिला आहे. गुरुवारी हा डेमार्श देण्यात आला आहे. याशिवाय, हीच सूचना नवी दिल्लीतील  पाकिस्तानच्या उच्च आयुक्तांनाही देण्यात आली आहे.