पाथरीतील फौजदार, पोलिसाचे निलंबन

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका फौजदार आणि एका कर्मचा-यास बुधवारी (दि. 2) पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले आहे. यामुळे पाथरी पोलीसात खळबळ माजली आहे. आर्थिक व्यवहार केल्याच्या आणखी किती घटना उजेडात येतात याकडे लक्ष लागले आहे. तर दुससरीकडे आर्थिक व्यवहार करणा-या पोलिसांवर कारवाई केल्याने सामान्य जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

टोपाजी कोरके असे निलंबनाची कारवाई केलेल्या फौजदाराचे नाव आहे. कोरके यांनी एका घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी नगरसेवक आयुब उर्फ लालू खान यांच्याकडून त्यांच्यासह पाच नातेवाईकांना जामीन होण्यासाठी सहकार्य पाहिजे असल्यास पैशाची मागणी करत रक्कम स्विकारून पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचे प्रथमदर्शनी निर्दशनास आल्याने पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी कोरके यांना निलंबीत केले आहे.

दुस-या घटनेत रमेश पांडुरंग मुंडे या पोलीस कर्मचा-यास पोलीस अधिक्षकांनी निलंबीत केले आहे. कर्मचारी मुंडे यांनी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालेल्या एका व्यक्तीस दिवसभर ठाण्यात थांबवून ठेवले व रात्री जमानत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास होकार मिळाल्यावर एका अर्जावर सह्या घेऊन उद्या जमानत करून देतो, असे म्हटले. त्यानंतर काहीवेळाने तेथील होमगार्ड केशव मुंडे यांच्या मार्फत जमानतीसाठी संबधित व्यक्तीस 30 हजार रुपयांची मागणी केली. इतकी रक्कम देण्यास तयार नसल्याने त्यास रात्रभर पोलीस कोठडीत ठेवण्याचे बेकायदेशीर कृत्य केले, असे पोलीस अधिक्षक मीना यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी मुंडे हे बाभळगाव बीटात कार्यरत नसतानाही त्या गुन्ह्याचा त्यांचा काही संबध नसताना त्यांनी होमगार्ड मुंडे यांच्यामार्फत 30 हजार मागत बेकायदेशीर कृत्य केल्याने पोलीस अधिक्षकांनी रमेश मुंडे यास निलंबीत केले आहे.