RBI च्या निर्णयामुळे सामान्य माणसाला बसू शकतो धक्का, कमी होऊ शकतो FD वरील ‘नफा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पुन्हा रेपो दर व्याजदरात ०.४० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फायदा छोट्या कंपन्यांना आणि बँकांना तर होईलच. पण याचा परिणाम एफडी करणाऱ्यांवरही होईल. एका वृत्तानुसार, बँका कर्जाच्या व्याजदरावरील त्यांचे मार्जिन कमी करू शकतात. म्हणजे कर्जाच्या दरातही घट होऊ शकते. तसेच एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांचा नफाही कमी होऊ शकतो.

तुमच्या एफडीच्या नफ्यावर होणार परिणाम-
तज्ञांचे म्हणणे आहे की, आरबीआयच्या या निर्णयामुळे बँका ठेवी दरावरील व्याज दर कमी करू शकतात. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त लिक्विडीटीमुळे व्याज दरावर दबाव येऊ शकतो. मुदत ठेवींवरील व्याज दर ०.२५ वरून ०.५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

यापूर्वी जेव्हा आरबीआयने व्याजदरात ०.७५ टक्के कपात केली होती, तेव्हापासून आतापर्यंत एसबीआयसह अनेक मोठ्या बँकांनी एफडीवरील व्याज दर कमी केले आहे. १२ मे रोजी एसबीआयने ३ वर्षाच्या कालावधीच्या एफडीवरील व्याज दर ०.२० टक्के कमी केले. मात्र बँकेने ३ वर्षापासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला नव्हता. बँकेने निवेदन जारी करत म्हटले की, सिस्टम आणि बँक लिक्विडीटी लक्षात घेऊन आम्ही ३ वर्षाच्या कालावधीपर्यंतच्या रिटेल टर्म डिपॉजिट दरात ही कपात करत आहोत.

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या पर्यायांचा विचार करण्यापूर्वी त्यांची जोखीम घेण्याची क्षमता पाहावी. व्याज दर कमी झाल्यास परताव्याऐवजी गुंतवणूकदारांनी त्यांचे भांडवल सुरक्षित राहील याचा विचार केला पाहिजे.