भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून 18 जणांचा पथक, तक्रारी असल्यास या नंबरवर साधा संपर्क
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव काळात मोदक आणि पेढ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी निष्कृष्ट प्रतीच्या भेसळयुक्त खव्याचा वापर करुन पेढे आणि मोदक तयार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याच अनुषंगाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून १८ अन्न सुरक्षा अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत मिठाई विक्री दुकानातील मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक मंडळांकडून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक मंडळाच्या परिसरात तात्पुरत्या स्वरुपाची दुकाने थाटून पेढे, खव्याचे मोदक यांची विक्री करण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. उत्सवाच्या कालावधीत घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांकडून मिठाईची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात दहा दिवस भेसळीच्या घटना रोखण्यासाठी मिठाई विक्रेत्यांकडून तयार करण्यात आलेलं पेढे, मोदकांची तपासणी करण्यात येणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी जाऊन ‘एफडीए’ ची पथके मिठाई विक्रेत्यांकडे तपासणी करणार असून, मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती ‘एफडीए’ तील अधिकाऱ्यांनी सांगितली.
तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांक
सणासुदीच्या काळात मिठाईला जास्त प्रमाणात मागणी असते. मागणीमुळे मोठ्या प्रमाणावर मिठाई विक्रीसाठी आणली जाते. मिठाई तयार करताना अन्न सुरक्षेच्या नियमांकडे कानाडोळा तसेच भेसळयुक्त खव्याचा वापर करण्यात येतो. म्हणून उत्सवाच्या कालावधीत काही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी कराव्यात.