एफडीएने नष्ट केला १४ हजार किलो निकृष्ट दर्जाचा बर्फ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत एफडीएने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ३१ ठिकाणी छापे मारून १४ हजार किलो पेक्षा जास्त निकृष्ट दर्जाचा बर्फ नष्ट केला आहे. सध्या उन्हाळ्यात थंड पेयांना मोठी मागणी असल्याने अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा बर्फ टाकून ग्राहकांना थंड पेये दिली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाला हे समजताच मुंबईसह आजुबाजूच्या परिसरातील ही छापेमारी करण्यात आली.

तीव्र उन्हाळा असल्याने मुंबईत रस्तोरस्ती थंडपेयांच्या गाड्या दिसून येतात. शिवाय इतर वापरासाठीही बर्फाची मागणी वाढली आहे. यामुळे दुषित बर्फ मोठ्याप्रमाणात पुरवण्यात येत आहे. बर्फ दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मुंबईतील दूषित बर्फ शोधून त्यांच्यावर कारवाई करता यावी यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनासह मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने एकत्रित कारवाई करून अखाद्य बर्फ विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.

अखाद्य बर्फ विक्रेत्यांविरोधातील विशेष मोहिमेद्वारे मे महिन्यात ३१ ठिकाणी कारवाई करून १४ हजार ८५१ किलोचा निकृष्ट दर्जाचा बर्फ नष्ट करण्यात आला आहे. याची किंमत ४५ हजार रुपये इतकी होती. पाच विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शीतपेयात दूषित बर्फाचा वापर करणे नागरिकांसाठी धोकादायक आहे.

दूषित बर्फात ई-कोलाय हे विषाणू असल्याने पोटदुखी, डायरिया, गॅस्ट्रो आणि कावीळसारखे आजार होतात. कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या बर्फात निळा रंग टाकणे बंधनकारक आहे. अशा बर्फ कारखान्यांवरही कारवाई करण्यात करण्यात येणार आहे, असे एफडीएच्या अन्न विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले.