Pune News : भोरमधील नीरा-देवघर धरणात दोन मजूर बुडाल्याची भिती

भोर : पोलीसनामा ऑनलाइन – भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील नीरा देवघर धरणात दोन मजूर बुडाले आहेत. ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.1) सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. अंकुश गोपाळ निगडे (वय-36 रा. वडतुंबी) व कैलास भेदे (वय-35 रा. नांदेड) असे बुडालेल्या मजूरांची नावे आहेत.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही बांधकामावर मोलमजूरीची कामे करीत होते. त्यांनी आज दुपारी कामावर सुट्टी घेतली होती. दुपारी जेवण केल्यानंतर ते धरणात पोहण्यासाठी गेले होते. नीरा-देवघर धरणाच्या देवघर गावाच्या बाजूच्या मिनिस्टर पॉइंटच्या बाजूने ते धरणात पोहण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत वडतुंबी येथील आणखी एक मजूर होता. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो काठावरच थांबला.

पोहण्यासाठी पाण्यात गेलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. भोर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच भोई समाजाच्या तरुणांना बोलावून घेत पाण्यात बुडालेल्या दोघांचा शोध घेतला. भोई समाजाच्या तरुणांनी रात्री अंधार पडेपर्यंत त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.