जनावरांमधील ‘क्रायमिन काँगो’ महाराष्ट्रात येण्याची भीती !

पोलिसनामा ऑनलाईन ईम – जनावरांमध्ये आढळणार्‍या ‘क्रायमिन काँगो’ या विषाणूजन्य आजाराचा गुजरातमधून महाराष्ट्रात शिरकाव होण्याची भीती आहे. बाधित जनावरांपासून मनुष्यात संक्रमित झाल्यास अत्यंत घातक ठरणार्‍या या आजाराबाबत राज्यातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातच्या बोटाद आणि कच्छ या जिल्ह्यांत या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यापूर्वी काँगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशात प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. गायी, म्हशी अशा रोगवाहक जनावरांच्या संपर्कात आलेले पशुपालक, मटण विक्रेते, पशुवैद्यक व संपर्कातील व्यक्तींना या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने खबरदारी घेण्याबाबत दक्ष केले आहे. गुजरातलगत असल्याने महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आजाराचा प्रसार प्रामुख्याने जनावरावर बसणार्‍या गोचिडांमुळे होत असल्याने गोचिड निर्मूलनाचा उपाय सुचवण्यात आला आहे. शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक यांनी प्रतिबंधक उपायांचा म्हणजेच स्वच्छता राखणे, हातमोजे, मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. गुजरात राज्यातून मोठया प्रमाणात गीर गायी, मेहसाना म्हशी महराष्ट्रात येतात. गुजरातमध्ये हा रोग नियंत्रणात येईपर्यंत त्या राज्यातून जनावरे सांभाळ करण्यासाठी किंवा चारण्यासाठी आणण्याचे संयुक्तिक ठरणार नाही.