Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आले हजारो हात एकत्र (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे एकमेकांवरती संशय घेत आपापल्या घरात राहून माणसं दुरावतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा स्थितीमध्ये संकटाला तोंड देण्यासाठी दुरूनच का होईना पण मदत करणाऱ्यांच्या बातम्या सर्वांना ऊर्जा देत असतात. मुंबईतील गोवंडीनजिकच्या दाट लोकवस्तीमध्ये कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका सार्वधिक. त्यात लॉकडाऊन मुळे सर्व शहर ठप्प. त्यामुळे रोज कमवून खाणाऱ्या या वस्तीमधील लोकांना कोरोना संसर्गामुळे नाहीतर भुकेने मरायची वेळ येईल अशी भीती सतावत होती. पण काही जाणते व संवेदनशील हात सरसावले आणि आज हजारो नागरिकांना ताज, सकस, शिजवलेले अन्न घरपोच मिळण्याची सोय झाली. ही गोष्ट आहे मुंबईतील सर्वात मोठ्या कचराकुंडीवर उभ्या असलेल्या वस्तीची. प्रेरणा देणारी आणि तुमच्या कडून काही मागणारी.

मुंबईतील गोवंडी या उपनगरात पूर्वीच्या कचराडेपोवर छोटे छोटे रस्ते करून बैगनवाडी नावाची वस्ती वसवली आहे. येथे हातावर पोट असलेले मजूर, कामगार, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, असे हजारो लोक या कचरा डेपोवर वसवलेल्या वस्तीत राहतात. मात्र लॉकडाऊन काळात त्याच्या हाताचं काम गेलं. कामासाठी बाहेर पडणं मुश्किल झालं आणि जेवायचं काय हा प्रश्न उभा राहिला.

या बैगनवाडीचं अस्तित्व लक्षात आलं आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पण संवेदनशील असणाऱ्या काही लोकांना. या लोकांनी एकत्र येत कम्युनिटी किचन येथे सुरु करण्याची कल्पना मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत त्यासाठी निधी गोळा केला. क्राउड फंडिंगच्या द्वारे अवघ्या १० दिवसात २८ लाख रुपये गोळा केले. आणि याच वस्तीत उभं राहील लोकांनी लोकांसाठी चालवलेलं किचन. अर्थात ‘फिडींग फ्रॉम फार’ या नावाने हा उपक्रम सुरु झाला.

गोवंडी येथील स्थानिक लोकांच्या मदतीने या वस्तीमध्येच किचनची जागा तयार झाली. उभा राहिलेल्या निधीतून दररोजच धान्य, भाज्या माल येथे येऊ लागला आणि कामाच्या शोधात असणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच किचनची जबाबदारी घेतली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, मास्क लावून इथे अन्न शिजत आणि इथंच पॅक करून घरोघरी पोहचवलं जात. येथील वस्तीतच राहणारे कार्यकर्ते मिळाल्याने त्यांनाच स्वयंसेवक करून घेतलं. व त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेचे धडे देत गरजूंपर्यंत जेवण पोहचविण्याच काम दिलं. असं या उपक्रमाचे जनक म्हणतात.

Feeding From Far चे परितोष पंत सांगतात, “आम्ही येथील गरजू लोकांना दोन वेळच जेवण देतो. त्यांचा दरदिवशी माणसाचा खर्च ६० रुपये आहे. सध्या अशा ५००० लोकांची दोन्ही वेळची भूक दररोज भागवत आहोत. आता १००० जणांना जेऊ घालू शकेल अशी स्वयंपाकाची जागा आणि क्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे.

https://youtu.be/JFtBo8mFQkQ

दरम्यान, हा उपक्रम सुरु झाल्यापासून ‘फिडींग फ्रॉम फार’ च्या स्वयंसेवकांनी १,७०,००० जेवणाची पॅकेट्स पुरवली आहे. ५०,००० गरजू लोकांना दोन वेळच जेवण पुरवायचं त्याचं लक्ष आहे. त्यासाठी मदतीचं आवाहन परितोष यांनी केलं आहे.

ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे अशांनी https://www.ketto.org/fundraiser/FeedingfromfarForCorona या लिंकवर क्लिक करावं. येथे कोणत्या स्वरूपात दान करता येईल याची सविस्तर माहिती दिली आहे.