परळीत स्त्री जातीचे अर्भक आढळले; अज्ञात महिलेवर खुनाचा गुन्हा

परळी : पोलीसनामा ऑनलाईन 

परळी तालुक्यातील मौजे नागदरा येथील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत दि. २६ एप्रिल रोजी नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले होते. या दुर्दैवी बाळाला मारून विहिरीत फेकल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाल्याने या प्रकरणी (दि. ३१) रोजी अज्ञात महिलेवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B072MFVNML’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3045d5e8-9552-11e8-af14-a9ab22aa4dc0′]

मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील नागदरा येथील पोलीस पाटील प्रकाश धोंडीराम नागरगोजे यांना दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावाजवळील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत अंदाजे २-३ दिवसापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले. त्या बाळाला पाण्यातील माश्यांनी आणि खेकड्यांनी हाता-पायाला कुरतडलेले होते. याची खबर नागरगोजे यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली . या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक सपकाळ यांच्याकडे होता. परंतु, सपकाळ यांची बदली झाल्याने पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्याकडे देण्यात आला. दि. ३० जुलै रोजी या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवावालानुसार अर्भकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पाण्यात टाकल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी अज्ञात महिलेविरूद्ध परळी पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा नोंदविला असून पोलीसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.