‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’ जड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीत एकूण 3,237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात 152 मतदारसंघातून एकूण 235 म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. अनेक ठिकाणी तर महिलांविरुद्ध पुरुष असा सामना रंगताना दिसत आहे. याशिवाय काही ठिकाणी तर ही निवडणूक तेथील महिला उमेदवाराच्या प्रतिष्ठेची बनलेली आहे.

पुढील 4 मतदारसंघातील महिला उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष
1) पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे
परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मैदानात आहेत. या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये परळीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढलेले दिसते. त्यामुळे आता ही लढाई पंकजा मुंडे यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.

2) मुक्ता टिळक विरुद्ध अरविंद शिंदे
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक भाजपकडून कसबा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अरविंद शिंद उभे आहेत. याच मतदारसंघातून मनसेचे अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कसब्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

3) प्रणिती शिंदे विरुद्ध दिलीप माने
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसकडून सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात आहेत. प्रणिती यांच्या विरोधात शिवसेनेने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. पूर्वी याच मतदारसंघातून प्रणिती शिंदे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकसभेत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. याशिवाय राज्यात काँग्रेसविरोधी वातावरण असल्याने ही लढाई प्रणिती शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. इतकेच नाही तर दिलीप माने हेदेखील काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत.

4) रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील
भाजपने या निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमधून भाजपकडून रोहिणी खडसे पहिल्यांदाच विधासभेच्या रिंगणात आहेत. ही रोहिणी खडसे यांच्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक आहे. रोहिणी खडसेंसमोर अपक्ष उभ्या असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचे आव्हान असणार आहे. मुख्य म्हणजे ते अपक्ष असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लढाई अजून रंगताना दिसत आहे.

Visit : Policenama.com