जळगावात महिला डॉक्टरांचे हातपाय बांधून ५ लाख चोरले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवरील एका अपार्टमेंटमध्ये एका महिला डॉक्टरांचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करीत पाच लाख रोख व काही दागिने लांबविण्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  डॉक्टरांच्या घरात शिरुन त्यांना लुबाडण्याची ही गेल्या काही महिन्यातील दुसरी घटना आहे.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवर कामिनी कमल हॉस्पिटल आहे. त्या मागील एका अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर बालरोगतज्ञ डॉ. निशांत पाटील व डॉ.अचल पाटील हे डॉक्टर दाम्पत्य राहतात. डॉ. निशांत पाटील हे  सोमवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास गणपती हॉस्पिटलमध्ये गेले. ते रवाना होताच थोड्याच वेळात तीन जण आले. त्यांनी फ्लॅटची बेल वाजविली. डॉ. अचल पाटील यांनी दरवाजा उघडताच त्यांनी घरात प्रवेश करीत त्यांचे तोंड दाबले व पैसे, दागिने कुठे आहेत, याबाबत विचारणा केली. कपाटात असलेली पाच लाखाची रोकड त्यांनी चोरट्यांना दिली. यावेळी त्यांनी डॉ.पाटील यांच्या हातातील अंगठीही काढून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे हातपाय बांधून पोबारा केला.

त्यानंतर डॉ.अचल पाटील यांनी कसेबसे हातपाय सोडले व पती डॉ.निशांत पाटील यांना मोबाईलवर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी  तत्काळ घरी धाव घेतली. पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलिसांनी घटनास्थळला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. गेल्या काही महिन्यांपूर्वी गांधी नगरात डॉ.नरेंद्र दोशी यांच्या निवासस्थानीही चोरट्यांनी डॉ.दोशी यांच्या पत्नीला मारहाण करीत पैसे लांबविल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.