भुलतज्ज्ञ महिला डॉक्टरांची हॉस्पिटलमध्ये आत्महत्या

सिन्नर (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन – सिन्नर शहरातील प्रसिद्ध भुलतज्ज्ञ आणि स्त्रिरोग तज्ज्ञ डॉ. वैजयंती काकडे (वय-४३) यांनी हॉस्पिटलच्या गच्चीवर भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून सिन्नर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वैजयंती काकडे या सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध भुलतज्ज्ञ आणि स्त्रिरोग तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. वर्षभरापूर्वीच नाशिक-पुणे महामार्गालत वाजे पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या नवीन सुसज्ज जागेत हॉस्पिटल स्थलांतरित करण्यात आले होते.  हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होत्या. याच हॉस्पिटलच्या गच्चीवर त्यांनी आत्महत्या केली.

मध्यरात्री जाग आल्यावर डॉ. वैजयंती खोलीत नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. अभिजित त्यांना शोधण्यासाठी बाहेर आले. हॉस्पिटल कडे जाणारा दरवाजा बंद असल्याने ते गच्चीकडे गेले असता तेथे डॉ. वैजयंती या विषारी औषध सेवन केलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मयत डॉ. वैजयंती यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे. डॉक्टरने आत्महत्या केल्याचा हा प्रकार समजल्यावर शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सिन्नर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी करित आहेत.

डॉ. वैजयंती काकडे यांच्या मृतदेहाचे शहरातील नगरपालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मृतदेहाजवळ ५ मिलीची सिरींज सापडल्याने त्यांनी नेमके कोणते औषध टोचून घेतले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा तपशील कळण्यासाठी डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच त्याची उकल होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.