‘हाऊसफुल्ल-4’च्या शूटिंगवेळी डान्सरवर अत्याचार 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ‘हाऊसफुल 4’ चित्रपटामागचं विघ्न काही संपताना दिसत नाही. #MeToo मोहिमेमुळे आधी नाना पाटेकर आणि नंतर दिग्दर्शक साजिद खान यांना चित्रपट सोडावा लागल्याने चर्चेत आलेल्या हाऊसफुल 4 चित्रपटाच्या सेटवर अजून एका महिलेने गैरवर्तवणूक झाल्याचा आरोप केला आहे. चित्रकूट स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चित्रपटाच्या शुटिंगवेळी नाना पाटेकरने गैरवर्तन केल्याचे आरोपांमुळे चित्रपटसृष्टीतील वातावरण ढवळून निघाले असताना आता हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर एका ज्युनिअर आर्टिस्टवर सहा जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. पिडीत ज्युनिअर आर्टिस्ट सेटजवळ आपल्या सहकाऱ्यासोबत बसलेली असताना तेथे पवन शेट्टी आणि सागर यांच्यासह अन्य सहा जणांनी येऊन छेड काढली. तसेच तिच्या शरिराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या ज्युनिअर आर्टिस्टने रोखले असता शेट्टीने तिला ढकलून देत तिच्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप या ज्युनिअर आर्टिस्टने केला आहे.

डान्सर आमीर शेख आणि पवन शेट्टी यांच्यात जुना वाद होता. त्याचा बदला घेण्यासाठी पवन शेट्टी आपल्या साथीदारांसह चित्रकूट स्टुडिओत जबरदस्तीने घुसला आणि त्याला बाहेर घेऊन जात होता. त्यावेळी महिला डान्सरने आरडाओरड केली.तेव्हा पवन शेट्टीने तिचा विनयभंग केला. विनयभंगाची घटना घडली, त्यावेळी ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सेटवर अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख हेही उपस्थित होते. या सर्व प्रकरानंतर अक्षय कुमारने पीडित महिलेला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास सांगितले. मग पीडित महिलेने इतर सहकाऱ्यांसोबत आंबोली पोलिस ठाणे गाठले आणि डान्सर पवन शेट्टीविरोधात तक्रार दिली. पवन शेट्टीविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून पिडीत तरुणीने आरोपींना गजाआड करण्याची मागणी केली आहे.