90 हजार रुपयाची लाच घेताना जात प्रमाणपत्र कार्यालयातील महिला अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 90 हजार रुपयाची लाच घेताना वर्तकनगर येथील कोकण विभागातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील वरिष्ठ संशोधन अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला अधिकाऱ्यासह कामाठी म्हणून काम करणाऱ्याला अटक केली.

एस.ए. गोवेकर (वय-45) आणि कामाठी म्हणून काम करणारा अमित मोरे (वय-38) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार यांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता गोवेकर यांनी स्वत: तक्रारदार यांच्याकडे 90 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता गोवेकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून गोवेकर आणि मोरे यांना तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.