Maharashtra : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, राज्यात खळबळ

अमरावती: अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून दीपाली या गर्भवती होत्या. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दिपाली चव्हाण दीड वर्षांपासून कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली. हि घटना समजताच एकच खळबळ उडाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. मात्र त्यातील तपशील समजू शकला नाही. रेंजर असोसिएशन व शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. आर्थिक अडचणींबरोबरच अनेक कारणांमुळे लॉकडाऊनच्या काळात राज्यात अनेक आत्महत्याच्या घटना समोर येत आहे.आत्महत्येच्या घटनांमुळे देश हादरला आहे.