महिला फिजिओथेरपिस्टची गळफास घेऊन आत्महत्या

भागलपूर : वृत्तसंस्था – एका महिला फिजिओथेरपिस्टने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बिहारच्या भागलपूर शहरातील लालबाग कॉलनीत सोमवारी घडला. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. प्रियंका प्रियदर्शिनी असे आत्महत्या केलेल्या महिला फिजिओथेरपिस्टचे नाव आहे.

पोलीस उपअधीक्षक राजवंश सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ते म्हणाले की, मृत डॉक्टर प्रियंका प्रियदर्शिनी अविवाहित होती आणि त्या आपल्या कुटुंबासमवेत भागलपूरमधील टिळकमाझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालबाग कॉलनीत सहा वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होत्या.

डॉ. प्रियंका प्रियदर्शिनी या पूर्णिया जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात काम करत होत्या. काही महिन्यापासून त्या नैराश्येत असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच काही दिवस त्या कामावर देखील गेल्या नव्हत्या. सोमवारी रात्री उशिरापर्यंत खोलीच्या बाहेर न आल्याने त्यांच्या वडीलांनी खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांची मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. कुटुंबाने तिचा मृतदेह खाली उतरवून पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृताच्या कुटुंबातील सदस्य आणि शेजारी राहणाऱ्या इतरांकडे चौकशी केली. पुढील तपास पोलीस करित आहेत.