कौतुकास्पद ! कॅन्सर पीडितांसाठी ‘या’ महिला पोलीस अधिकाऱ्याने केलं ‘मुंडन’, देशभरातून कौतुक (व्हिडीओ)

केरळ : वृत्तसंस्था – केरळच्या थिस्सूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमार सध्या सोशल मीडियावर स्टार बनल्या आहेत. त्यांनी सर्वांना प्रेरणा देणारे असे काम केले आहे. 46 वर्षीय अपर्णा यांनी डोक्यावरील सर्व केस काढले आहेत. कॅन्सरच्या रुग्णांसाठी त्यांनी असं केलं आहे. कॅन्सरच्या रुग्णांना किमोथेरपी करावी लागते ज्यात त्यांच्या डोक्यावरील पूर्ण केस निघून जातात. याचा रुग्णांवर मानसिक प्रभाव पडतो. अपर्णा यांनी अशा रुग्णांना विग बनवण्यासाठी आपले केस दान केले आहेत. देशभरातून या महिला अधिकाऱ्याचं कौतुक होताना दिसत आहे.

‘माझ्या मते खरे हिरो तर ते आहेत जे आपले अवयव दान करतात’
बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्माही अपर्णा यांच्या या कामगिरीने प्रभावित झाली आहे. तिने इंस्टाग्रामवर अपर्णा यांच्या फोटोसहित स्टोरी शेअर करत त्यांना सलाम केला आहे. रिपोर्टनुसार, अपर्णा यांनी मंगळवारी डोक्यावरील सर्व केस काढले. एका वृत्तपत्राशी बोलताना त्या म्हणाल्या की, “अशा छोट्या कामांना मी कौतुकास्पद नाही मानत. मी जे केलं त्यात मोठं असं काहीच नाही. माझे केस 2 वर्षांत परत येतील. माझ्या मते खरे हिरो तर ते आहेत जे आपले अवयव दान करतात. केसांमुळे केवळ लुकवर परिणाम होतो आणि लुक जास्त महत्त्वाचा नसतो.”

‘…म्हणून केस दान केले’
अपर्णा यांना विचारण्यात आलं की, त्यांना केस कापण्याचा विचार कसा आला तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मी नेहमीच माझे थोडे थोडे केस दान करत असते. परंतु यावेळी मात्र मी मुंडन करत सर्वच केस दान केले. मी पाचवीत शिकणाऱ्या कॅन्सर पीडित मुलाला पाहिलं. त्याचे पूर्ण केस गेलेले होते. मला त्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर मी जिल्हा पोलीस प्रमुख आयपीएस एन. विजयकुमार यांच्याकडून केस कापण्याची परवानगी घेतली आणि त्यांनीही यासाठी परवानगी दिली.”

10 वर्षांपू्र्वीही अपर्णा आल्या होत्या चर्चेत
अपर्णा यांचीही काही पहिलीच कामगिरी अशी नाही ज्याची खूप चर्चा होत आहे. समाजसेवेशी संबंधित अनेक कामे त्यांनी केली आहेत. 10 वर्षांपू्र्वीही त्या अशाच चर्चेत आल्या होत्या. एका गरिब कुटुंबाकडे मृतदेह रुग्णालयातून घरी नेण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा अपर्णा यांनी सोन्याच्या तीन बांगड्या दान केल्या होत्या.

Visit : policenama.com