राज्यात गाजतोय लाचखोरीचा ‘मुळशी पॅटर्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट वेगवेगळ्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजला असतानाच सध्या मुळशी हे नाव वेगळ्याच कारणाने राज्यात गाजत आहे. सध्या राज्यामध्ये लाचखोरीचा ‘मुळशी पॅटर्न’ गाजतोय. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामुळे मुळशी गावाचे झालेले शहरीकरण आणि वाढलेल्या जमिनीच्या भावमुळे वाढलेली गुंडगिरी सर्वांसमोर आणली. याच मुळशीच्या तहसिलदाराने तब्बल १ कोटीची लाच घेऊन या गावचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. लाच घेतल्याची घटना ताजी असतानाच आज मुळशी तालुक्यातील भूगांवच्या महिला तलाठ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यामुळे सध्या ‘लाचखोरीचा मुळशी पॅटर्न’ राज्यात मोठ्या प्रमाणात गाजतोय.

जमीनीच्या उताऱ्यावरील नावे कमी करण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच वारस नोंदी प्रकरणात निकालपत्र देण्यासाठी मुळशी तहसिलदार सचिन डोंगरे याला १ कोटीची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर आज जमीनीचा सात बाऱ्यावरील नोंदी कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठी आणि कोतवाल यांना अटक करण्यात आली. या दोन कारवाईवरुन  महसुल विभागात लाचखोरीचे प्रचंड पेव आल्याचे होत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

काही दिवसांच्या फरकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मुळशी तालुक्यातील दोन मोठे मासे गळाला लागले आहेत. मुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले जमीनीचे व्यवहार यामुळे या ठिकाणी लाचखोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. जमीनीला मिळणाऱ्या कोट्यावधीच्या भावामुळे याठिकाणचे शेतकरी रातोरात कोट्याधीश होत आहेत. याचाच फायदा घेत महसूल विभागातील अधिकारी लाखोंची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकत आहेत. मुळशी तालुक्यात करण्यात आलेल्या दोन मोठ्या कारवाईमुळे लाचखोरीत ‘मुळशी पॅटर्न’ राज्यात गाजत आहे.

तक्रारदार यांचे क्षेत्र व वारसा नोंदीचे प्रकरणात तहसिलदार मुळशी यांनी दिलेल्या आदेशानुसार नांव नोंद व क्षेत्र नोंद करून सात बारा पत्रकी नोंदी घेण्यासाठी महिला तलाठी आणि कोतवाल यांनी 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारानी त्यांनी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. प्राप्‍त झालेल्या तक्रारीची नोंद करण्यात आली. त्यामध्ये महिला तलाठी आणि कोतवाल हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचुन त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

लाच स्वीकारल्यामुळे सचिन डोंगरे याच्याकडून मोठे घबाड लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता लाचलुचपत विभागाने त्याचे मूळ गाव असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी येथील घराची झाडाझडती घेतली. तसेच मोहोळ शहरातील बंगल्याचीसुद्धा तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच डोंगरे याचे बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील लॉकर सील करण्यात आले.