50 हजाराची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – चॅपटर केस न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई नालासोपारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. धर्मेंद्र सोनवणे (वय-41) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

धर्मेंद्र सोनवणे हा नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर चॅपटर केस दाखल न करण्यासाठी सोनवणे याने तक्रारदाराकडे 1 लाख 40 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता सोनवणे याने तक्रारदारकडून पोलीस ठाण्यात लाच स्विकारण्याचे कबुल केले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. सोनवणे याच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com