ऐतिहासिक कांद्याच्या भावाचा ‘मोजक्याच’ शेतकऱ्यांना फायदा

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – सप्टेंबर 2019 पासून ते डिसेंबर 2019 पर्यंत अनेक नवनवीन विक्रम करणारा कांदा गेल्या वर्षाच्या अखेरिस चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला होता. मात्र वाढलेल्या दराचा फायदा काही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाल्याचे आकडेवारी वरुण दिसून येत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कांद्याला सरासरी तीन हजारांपासून ते सहा हजार चारशे रुपये पर्यंत भाव मिळाल्याचे दिसून येत आहे; तर उर्वरित महिन्यांमध्ये कांद्याला सरासरी एक हजाराच्या आत भाव मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे ऐतिहासिक दर मिळूनही शेतकऱ्यांच्या हाती फार काही लागले नाही असे या आकडेवारीवरून समोर आले आहे.

कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत उन्हाळा आणि लाल कांद्याची साधारणता 37 लाख क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला कमीत कमी 1015 ते 2453 तर जास्तीत जास्त 2955 रुपये असा भाव मिळाला होता. देशातील कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी नाशिक जिल्हा प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असल्याने यावर देशातील कांद्याचे दर अवलंबून असतात. दररोज लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 ते 25 हजार क्विंटल कांद्याची आवक होत असून कांद्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत असते. मागणी आणि पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्यानंतर कांदा दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ-उतार दिसून येतो.

यावर्षी लांबलेला पाऊस आणि परतीच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे कांद्याने आजपर्यंतचे आपले सर्वे रेकॉर्ड तोडल्याचे दिसून आले आहे. परतीच्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कांद्याचे बाजार जरी चढे होते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खूप काही मिळाले असे म्हणता येणार नाही. गेल्या एक वर्षातील कांदा दराचा आलेख बघितला असता जानेवारी 2019 मध्ये कांद्याला सरासरी पाच रुपये किलो भाव मिळाला होता आणि डिसेंबर 2019 मध्ये 64 रुपये किलो असा दर मिळालेला होता.

ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोशल मीडियावर शेतकऱ्यांना कांद्याने लखपती केले असे अनेक विनोदही फिरले मात्र संपूर्ण वर्षभरातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची आवक व त्याला मिळालेले सरासरी दर याचा विचार केला तर वास्तव वेगळेच असल्याचे दिसून आले.

गेल्या तीन वर्षातील कांदा आवक आणि सरासरी भाव
2019 – 36 लाख 90 हजार क्विंटल – सरासरी भाव -2452
2018 – 35 लाख 80 हजार क्विंटल – सरासरी भाव -1105
2017 – 48 लाख 46 हजार क्विंटल – सरासरी भाव -1250

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/