बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी महत्वाचा साक्षीदार फितूर..!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे येथील विशेष मोक्का न्यायाधिश श्री एस एच ग्वालानी यांच्या समोर १९ वर्षा पूर्वीच्या तेलगी च्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी आज साक्षीदार क्र १५४ श्री ब्रीज भानसिंग सुभेदार सिंग वर ६२ रा बोरीवली (प) मुंबई यांची सिबीआय ने साक्ष नोंदवली. गेली १९ वर्षापासून हा सिबीआयचा विशेष खटला चालू आहे. मागच्या वर्षी मुख्य आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगीचे बेंगलोर कारागृह निधन झाले. त्याची पत्नी शाहिदा तेलगीचा खटला अद्यापही चालू आहे.

सिंग हे इस्टेट एजंट आहेत व २५ वर्ष त्यांनी मुंबईत फोर्ट भागात व्यवसाय केला. व्यवसाय करत असताना बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याने त्याच्या स्वतःच्या नावे व पत्नी शाहिदा तेलगी, मुलगी सना तेलगी, कामगार व नातेवाईकांच्या नावावर फोर्ट मुंबई भागात मोक्याच्या ठिकाणी स्थावर मिळकती पागडी पध्दतीने, भाडे तत्वावर व काही मिळकती विकत पध्दतीने घेतल्या व प्रत्येक स्थावर मिळकत सिंग या साक्षीदाराच्या मध्यस्थीने घेतल्या होत्या.

आज न्यायालयात सिंग या साक्षीदाराने साक्ष देताना मी तेलगीला ओळखत होतो व काही मिळकती मी त्याला मिळवून दिल्या. तेव्हा तेलगीने सांगीतले की मी ऑइल एजन्सीचे काम करतो. पण बर्याच गोष्टी मला आता या गोष्टीला १७ वर्ष झाल्याने आठवत नाहीत असे सांगीतल्याने सीबीआयचे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी साक्षीदार फितुर झाल्याचे जाहिर केले.

फितूर झाल्यावर ठाकरे यांनी साक्षीदाराची ऊलट तपासणी घेतली तेव्हा त्याने मला सीबीआय किंवा कोणीच जबाब वाचून दाखवीला नसल्याने मला काहीच सांगता येत नाही असे सांगितले. तेलगी व त्यांच्या साथीदारांना वाचविण्यासाठी तुम्ही फितूर झाला आहात असे ठाकरे यांनी विचारल्यावर सिंग यांनी तसे नाही असे उत्तर दिले. विशेष पथकाने दि २०/०६/२००३ रोजी माझा जबाब नोंदविला असल्याचे सिंग यांनी मान्य केले.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विद्याधर खोसे अ‍ॅड. मिलींद पवार यांनी साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. तुमच्या कडे तुम्ही इस्टेट एजंट असल्याचा कुठलाही कागदोपत्री पुरावा नसल्याचे सिंग यांनी ऊलट तपासात मान्य केले.

पुढील सुनावणी ०३ ऑगस्ट २०१९ रोजी होणार आहे.