पाचवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा : एचपी सुपरनोव्हाज् संघाचे सलग दोन विजय

पुणे- पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पाचव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत कर्णधार पुनम खेमनार हिच्या कामगिरीच्या जोरावर एचपी सुपरनोव्हाज् संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्या विरूध्द सलग दोन विजयाची नोंद केली. दोन्ही सामन्यात सामन्याचा मानकरी हा मान पुनम खेमनार हिने मिळवला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुनम खेमनार हिने केलेल्या ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपरनोव्हाज् संघाने कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाचा ५२ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एचपी सुपरनोव्हाने २० षटकात ४ गडी गमावून १४८ धावा केल्या. यामध्ये पुनम खेमनार हिने ६५ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ८५ धावा चोपल्या. तिला प्रियांका घोडके २२ धावा व सुशमा पाटील १७ धावा यांनी साथ दिली. चौथ्या गड्यासाठी पुनम आणि प्रियांका यांनी ३७ चेंडुत ५९ धावांची भागिदारी केली. प्रत्युत्तरामध्ये कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाला २० षटकात ७ गडी गमावून ९६ धावा जमविता आल्या. साक्षी वाघमोडे हिने ४८ धावांची खेळी केली.

दुसर्‍या सामन्यात एचपी सुपरनोव्हाज् संघाने निंबाळकर रॉयल्स् संघावर केवळ ३ धावांनी निसटता विजय मिळवून स्पर्धेत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. एचपी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ८ गडी गमावून ११४ धावा केल्या. माधुरी आगव २५, सुशमा पाटील १४, पुनम खेमनार १४, प्रियांका घोडके १५ आणि मानसी तिवारी १४ यांनी महत्वपूर्ण धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. निंबाळकर रॉयल्स् संघाच्या तेजल हसबनीस हिने ४६ चेंडूत ९ चौकारांसह ५५ धावा करून संघाला विजयाच्या समीप नेले. परंतु धावाच्या मध्यावर आणि महत्वाच्या टप्पावर त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि विजय अवघड होत गेला. निंबाळकर संघाचा डाव १९.३ षटकात व १११ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार पुनम खेमनार २४ धावात ३ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच प्रियांका घोडके (२-१४) हिनेही टिच्चुन गोलंदाजी केली.

महाराष्ट्राचा रणजीपटू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज् संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याने स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने महिला खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. दुबईमध्ये झालेल्या इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचा तसेच चैन्नई सुपर किंग्ज् या आपल्या आयपीएल संघातील त्याने अनुभव खेळाडूंना सांगितले.