पाच वर्षांपासून गुंगारा देणारा फरार आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी जवळ कारचालकाला कोयत्याने मारहाण करून धमकावून ५० लाख रुपये लूटून पसार झालेल्या आणि पाच वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली.

सुभाष लालबहाद्दुर सिंग (वय ३६,रा. अंजली नगर, संतोष नगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथे १३ ऑक्टोबर २०१० रोजी जकात नक्यासमोर एका चारचाकी मोटारीला दुचाकी आडवी लावून कोयत्याने मारहाण केली आणि त्याच्याकडील ५० लाखांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यानंतर याप्रकरणी राजडगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे साथीदार सोम्या मारटकर, मंदार चोरगे आणि एकाला अटक करण्यात केली होती.

परंतु सिंग पोलिसांना मागील पाच वर्षांपासून गुंगारा देत होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पाच वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सुभाष सिंग हा कात्रज येथे गंधर्व लॉन्स येथे रस्त्यावर उभा असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सिंगने दरोड्याच्या गुन्ह्यात आपण सहभागी असल्याची कबूली दिली.त्याला राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक दिनेश पाटील, अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, अनिल घाडगे, बाबा चव्हाण आदींनी ही कारवाई केली.