पुण्यातील मांजरीत ५० वर्षीय व्यक्तीचा घरात घूसून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरात घूसून ५० वर्षीय व्यक्तीवर ५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मांजरी गावात घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

राजाराम साळुंके (५०) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकऱणी अनिकेत गायकवाड आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम साळुंके हे मांजरी गावात राहण्यास आहेत. त्यांनी नुकतेच नवीन घर बांधले आहे. गुरुवारी त्यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेलेले असल्याने ते घरी एकटेच होते. त्यावेळी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घरात पाच जण घुसले. त्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून तेथून पोबारा केला. त्यानतंर शेजाऱ्यांनी लागलीच घराकडे धाव घेतली. याची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना घराबाहेर एक तलावर सापडली. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. साळुंके यांचा खून करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अशी माहिती पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.