धक्कादायक ! जगभरात वन्यजीवांची संख्या 68 टक्क्यांनी घटली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या हानीमुळे गेल्या 50 वर्षांत सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या एकूण संख्येत दोन तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष विश्व वनजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) संस्थेने काढला आहे. ‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2020’ या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर येते.

डब्ल्यूडब्ल्यूएफमार्फत दर दोन वर्षांनी जागतिक पातळीवर वन्यजीवांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला जातो. 1970 ते 2016 या काळातील अभ्यासासाठी 125 तज्ज्ञांचा सहभाग होता. अहवालातील ‘लिव्हिंग प्लॅनेट निर्देशांक’नुसार पृष्ठवंशीय प्राण्यांची संख्या कमी होण्यामागे, जमिनीचा वापरबदल आणि प्राण्यांचा व प्राण्यांवर आधारित व्यापार ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे यात नमूद केले आहे. वनांच्या जमिनीचा वापरबदल होणे आणि अशाश्वत शेती ही कारणे नोंदविली आहेत.

गेल्या 50 वर्षांत सुमारे चार हजार पृष्ठवंशीय प्राण्यांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्यानुसार गोडया पाण्याच्या अधिवासातील प्रजातींची संख्या 84 टक्क्यांनी घटल्याचे दिसून येते. 1970 पासून दरवर्षी सुमारे चार टक्के या वेगाने ही संख्या कमी होत गेल्याचे अहवालात नमूद केले आहे. पर्यावरणाचा र्‍हास करतानाच केवळ वन्यजीवांवरच नाही तर मानवी आरोग्य आणि जगण्यावरदेखील मानवाने विपरीत प्रभाव टाकल्याचे या अहवालातून दिसत असल्याचे, डब्ल्यूडब्ल्यूएफचे महासंचालक मार्को लॅब्मर्टिनी यांनी सांगितले.