‘कोरोनाविरुद्धचा लढा नक्की जिंकू’ असं म्हणत CM उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘हा’ महत्त्वाचा मंत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना विरुद्धचा लढा आता घराघरात पोहोचत आहे. आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागानं कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम यशस्वी करायची आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. वर्षा निवास येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी सीएम ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला होता. यावेळी ते बोलत होते.

‘कोरोना सोबत कसं जगायचं हे आपल्याला सगळ्यांनाच शिकावणं लागणार आहे’

यावेळी बोलताना सीएम ठाकरे यांनी नव्या मोहिमेबाबत महत्त्वाचं आवाहन केलं. सीएम ठाकरे म्हणाले, “राज्यातील जिल्ह्यांमध्ये सकारात्मकतेचे प्रमाण वाढत आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करत आहोत. परंतु आपलं आव्हान अजूनही संपलेलं नाही. लॉकडाऊनच्या काळात आपण ही लाट थोपवली होती. आता आपण हळूहळू सर्व खुलं करत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची अनेकजण मागणी करत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात आले आहेत. एकूणच कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता कोरोना सोबत कसं जगायचं हे आपल्याला सगळ्यांनाच शिकावणं लागणार आहे. या मोहिमेत आपण ते करणार आहोत.”

‘तसं झालं तरच आपण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकू’

पुढे बोलताना सीएम ठाकरे म्हणाले, “रोग होऊच नय देणं हा मंत्र महत्त्वाचा आहे. यासाठी आपली आरोग्य पथकं घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्यादेखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असं दिसतंय. 2014 मध्ये मी शिवआरोग्य योजनेत टेलिमेडीसीनचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार आहे. ही मोहिम परिणामकारक होणं गरजेचं आहे. तसं झालं तरच आपण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकू.” असंही ते म्हणाले.