बार्शाीत भाजप सहयोगी आमदार आणि सेना नेत्यामध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा परिणाम तालुका स्तरापर्यंत पोहचला आहे. त्यातच बार्शीतील राजकीय गुन्हेगारी सर्वश्रुत आहे. अधूनमधून तेथील एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणार्‍या दोन तुल्यबळ नेत्यांच्या समर्थकांमध्ये राडेबाजी नेहमी होते. सोमवारी रात्री भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत आणि शिवसेनेचे स्थानिक नेते तथा निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर एकमेकांना भिडले. त्यांच्यात ‘फ्री स्टाईल’ने हाणामारी झाली.

परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सोपल आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आणि सध्या भाजपचे सहयोगी आमदार असलेले राजेंद्र राऊत यांच्यात आडवा विस्तव जात नाही. गेल्या 20-25 वर्षांपासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले आहे. यात अलीकडे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केल्यामुळे बार्शीतील राजकीय राडेबाजीत त्यांचीही भर पडली आहे.

सोमवारी रात्री बार्शीत नगराध्यक्ष आसीफ तांबोळी यांच्या बंधूंच्या ज्यूस पार्लरचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम आटोपून आमदार राऊत हे मोटारीत बसत होते. त्यावेळी समोरच्या बाजूकडे भाऊसाहेब आंधळकर हे थांबले होते. तेव्हा राऊत व आंधळकर यांची एकमेकांना नजरानजर झाली. त्यातूनच शत्रुत्वाच्या भावनेतून हे दोन्ही नेते एकमेकांना भिडले. अक्षरश: ‘फ्री स्टाईल’ भांडण सुरू असताना तेथील व्यापार पेठेतील व्यापार्‍यांनी भीतीपोटी आपापली दुकाने पटापट बंद केली. त्यातच पळापळही झाली. त्यामुळे बार्शीत तणाव निर्माण झाला.