इंदापूरात राष्ट्रवादी अन् भाजपात लढत चुरशीची; मात्र ‘सरशी’ कुणाची ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची झाली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत व भाजपा पुरस्कृत अनेक पॅनल व स्थानिक आघाडी तसेच सर्वपक्षीय पॅनलनी एकूण 60 ग्रामपंचायतीत जोर लावून निवडणूका लढल्या. सोमवारी ( दि.18) सर्वच 60 ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. मात्र यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जवळपास समान ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात आल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे विजयी उमेदवारांचे सर्व लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. आता सरपंच कोणाचा आणि कोणत्या पक्षाचा होणार हे येणार काळ ठरवेल.

राष्ट्रवादीतर्फे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 60 पैकी 37 व 4 ग्रामपंचायती संमिश्र आहेत असे सांगत 37 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व तालुक्यात निर्माण झाल्याचे सांगितले. तर भाजपतर्फे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 60 पैकी 38 व 4 संमिश्र ग्रामपंचायती आहेत असे सांगत, 38 ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगत जाहीरपणे प्रसिद्धी पत्रक काढून माध्यमांना माहिती दिली. इंदापूरातील शासकीय गोडावूनमध्ये निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.