राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार ; दोन गटात तुफान ‘राडा’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी आणि सचिन सौदाई यांच्या गटात सोमवारी मध्यरात्री तुफान हाणामारी झाली. नगरसेवक आसवानी यांच्या मुलावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तर नगसेवकास पिस्तूलाच्या मागील बाजूने मारहाण करत दहशत माजवली. तर नगरसेवक आसवानी व त्यांच्या गटाने जातीयवाचक शिवीगाळ करुन, बेकायदेशीर जमाव जमवून बेदम  मारहाण केली. या बाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी (४९, रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिल्यानुसार सचिन राकेश सौदाई (३२), सनी राकेश सौदाई (२८), सुनील मुकेश शर्मा (२२, रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर ५ ते ७ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, दरोडा टाकणे, खुनी हल्ला करणे, धमकी देणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सचिन राकेश सौदाई (३३, रा. पिंपरी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, डब्बू आसवानी यांचा दुसरा मुलगा, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, जातीयवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेवक आसवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार सलोनी हॉटेल येथे झाला. सचिन सौदाई याचा वाढदिवस असल्याने आसवानी यांच्या सलोनी हॉटेलमध्ये सौदाई व इतर आले होते. या ठिकाणी हे जबरदस्तिने दारू आणि बियरचे बॉक्स मागवत होते. यास मनाई केल्याने त्यांनी गोंधळ घातला. याची माहिती मिळाल्यानंतर डब्बू आसवानी हॉटेलवर गेले असता पैसे देऊन घेऊन जा असे म्हटल्याने चिडून टोळक्याने राडा केला. टोळक्याने शिवीगाळ करून आसवानी यांचा मुलगा आशिष याला मारहाण सुरू केली. त्यावेळी सोडविण्यासाठी गेल्याने डब्बू आसवानी यांनाही मारहाण केली. कोयत्याने वार केले, बाटली फेकून मारली. तसेच पिस्तूलाच्या मागील बाजूने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलाच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली.

सचिन सौदाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन सौदाई आणि त्याचे मित्र हॉटेल सलोनी येथे गेले होते. त्यावेळी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी मागील निवडणुकीत मदत न केल्याचा राग मनात धरून जातीयवाचक शिवीगाळ केली. बेकायदेशीर जमाव जमवून वाद घातला. तसेच सिमेंट गट्टू, लाथा बुक्याने तसेच काचेच्या बॉटलने मारहाण करुन जखमी केले. या राड्यामध्ये दोन्ही गटाचे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तपास पिंपरी पोलीस करत आहेत. याबाबत नगरसेवक आसवानी यांना विचारले असता,  आमच्या हॉटेलमध्ये येऊन मुलावर हल्ला केला, पहाटे आमच्यावर राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल केला आहे.