कोथरुडमध्ये कोयत्याच्या धाकाने खंडणीसाठी राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोथरुडमध्ये दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची मागणी करत एका तरुणाने राडा घातल्याचा प्रकार प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला सायंकाळी घडली. याप्रकऱणी कोथरुड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. निखील संजय खोमण (३०, कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर ५५ वर्षीय दुकानदाराने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोथरुड येथील भेलके नगरमध्ये दुकान आहे. ते शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास  दुकानात असताना निखील खोमण त्याची जीप घेऊन तेथे आला. त्याने दुकानासमोर जीप लावली आणि कोयता काढून त्यांना दोन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

त्यानंतर त्यांनी खोमण याला खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे तो त्यांच्या दुकानातील रंगांचे चार डबे घेऊन लागला. त्यावेळी त्यांना त्याला अडविले. त्याने शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कोयत्याने वार केला. तेव्हा त्यांनी तो वार चुकविला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेजारील दुकानदार व इतर लोक तेथे जमा झाले. त्यावेळी निखील खोमण याने हातातील कोयता उगारून इतरांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे शेजारील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करून घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ए. गायकवाड करत आहेत.