‘नागरिकत्व’ वरून सेना-भाजपमध्ये खडाजंगी, नगरसेवकाने पळवला ‘राजदंड’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद गुरुवारी जळगाव महापालिकेत पहायला मिळाले. भाजपने विधेयकाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेत प्रचंड गदारोळ केला. शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी एनआरसीला पाठिंबा देणाऱ्यांचा धिक्कार असो, अशी घोषणा देत राजदंडच पळवून नेला. यामुळे गोंधळात आणखी भर पडली. यावर भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत इब्राहिम पटेल यांना निलंबित करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे महासभा होती. सभेच्या सुरुवातीलाच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून जोरदार पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. भाजपने या कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल हे जागेवरुन उठून थेट महापौरांच्या दिशेने चालत गेले. त्यांनी व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलून घेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध असो, भारतीय संविधानाचा विजय असो, हिंदू-मुस्लिम भाई भाई अशा घोषणा देत राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार भाजपच्या काही नगरसेवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पटेल यांच्या दिशेने धाव घेत राजदंड पळवणाऱ्या पटेल यांना सभागृहाच्या वेलमध्ये पकडले. त्यांच्याकडून राजदंड हिसकावून घेत वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. या प्रकरामुळे काहीवेळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राजदंड पळवल्याने महासभा 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आली. तसेच पटेल यांच्यासह एमआयएमचे रियाज अली यांना आजच्या सभेपुरते निलंबित करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/