पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रात्री उशीरापर्यंत जोरात डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी  गेलेल्या पोलीस उप निरीक्षकास धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) मध्यरात्री एकच्या सुमारास खडकीतील शेवाळे टॉवर्स येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तन्वीर शेख (वय ४६, रा. सुरती मोहल्ला, खडकी), सिद्धाराम तिपन्ना यळसंगी(वय ३०, रा. दर्गा वसाहत, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे असून शैलेश गायकवाड (रा. सुरती मोहल्ला, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. भोसले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळे टॉवर्सजवळ सोमवारी मध्यरात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी तेथे मोठ्या आवाजात डी जे चालू होता. याची तक्रार नागरिकांनी मध्यरात्री पोलीस नियंत्रण कक्षाला कडे केली. या तक्रारीनुसार बीट मार्शल तेथे गेले व त्यांनी स्पीकर बंद करायला सांगितले. परंतु, आरोपींनी पोलिसांचे काही न ऐकता त्यांच्याशी वादावादी सुरु केली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक एस. बी. भोसले तेथे गेले. भोसले व त्यांच्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना तेथील लोकांनी धक्काबुक्की करुन स्पीकर बंद करण्यास विरोध केला. अश्लिल शिवीगाळ करुन पोलीस शिपाई म्हस्के यांना धक्काबुक्की केली.

बीट मार्शल यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली. त्यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एच. एस. ठाकुर अधिक तपास करीत आहेत.